बेळगाव लाईव्ह : शिक्षणातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षा जवळ आल्या असून विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
शिक्षण खात्याने वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक वेळेपूर्वीच जाहीर केल्याने दहावीचे विद्यार्थी जोरदार तयारीला लागले आहेत. वार्षिक परीक्षेपूर्वी होणारी पूर्वपरीक्षा २३ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान होणार असून शाळांमधून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात येत आहे.
यावर्षी ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत दहावीच्या परीक्षा होणार आहेत. कोविड कालावधीत दहावी परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता. मात्र यावर्षी पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
जानेवारी अखेरीस शाळांनी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला असून वार्षिक परीक्षेच्या धर्तीवर सरावासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी फेब्रुवारी महिन्यापासून उजळणी घेतली जात आहे.
मार्च मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शिक्षण विभागानेही तयारी सुरु केली असून शाळा प्रशासनांना डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हॉलतिकिटमधील माहिती पडताळून येत्या दोन दिवसात अचूक माहिती परीक्षा मंडळाला द्यावी लागणार आहे. जेमतेम दीड महिन्यावर दहावीच्या परीक्षा होणार असून शिक्षण विभाग, शाळा आणि विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारीला लागले आहेत.