बेळगाव लाईव्ह : बेळगाव मध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करण्यात येत असून स्मार्ट सिटी कामकाजात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाची पाहणी करण्यासाठी ते दाखल झाले होते. या ठिकाणी सुरू असलेले कामकाज हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आपल्याकडे आल्यानंतर येथील पाहणी करण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास करण्यात येत असल्याचे केवळ भासविण्यात येत आहे.
परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामकाजात जनतेच्या पैशांचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोपही कोंडुस्कर यांनी केला. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली असून आता पुन्हा याच रस्त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. यामुळे या कामकाजात भ्रष्टाचार होत असून निकृष्ट दर्जाचे कामकाज केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेळगाव मध्ये विविध ठिकाणी रस्ते, गटारी यासह इतर पायाभूत सुविधांची अजूनही वाणवा आहे. अनगोळ-वडगाव या भागामध्ये खोदकाम करून विविध ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. ही सर्व परिस्थिती विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात आजवर आलेली नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला लक्ष्य करून जबरदस्तीने आपल्या समवेत येण्यासंदर्भात त्रास देत असल्याच्या तक्रारीही आपल्यापर्यंत आल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.
बेळगाव मधील जनतेला अशा पद्धतीने वेठीस धरून लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी त्रास देत असतील तर बेळगाव मधील जनता त्यांना नक्कीच जाब विचारेल आणि अदलही घडवेल असे रमाकांत कोंडुस्कर म्हणाले.