बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोवर सुरु असलेल्या श्री चषक बेळगाव जिल्हा मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अल रझा आणि साईराज वॉरियर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. या सामन्याचे विशेष आकर्षण सामन्यासाठी पंच म्हणून येणारे ‘डॅनी सकट’ हे आहेत. रविवारी रंगणाऱ्या क्रिकेट सामन्यात बेळगावमधील व्हॅक्सिन डेपो मैदानावर डॅनी सकट यांची पंचगिरीतील अदाकारी पाहायला मिळणार आहे.
क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांप्रमाणे पंचांची भूमिका देखील महत्वाची असते. खेळ नियमानुसार खेळला जातोय कि नाही हे पाहण्यासाठी पंच महत्वाची भूमिका निभावत असतात. पंचांच्या निर्णयाने अनेक गोष्टी सामन्यात बदलत जातात. अनेकवेळा खेळाडूंप्रमाणे पंचांकडून चुकाही होतात आणि त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. मात्र, काही पंच हे असे असतात जे अनेकांच्या पसंतीस पडतात. क्रिकेटच्या मैदानात न्यायाधीशाप्रमाणे भूमिका बजावणाऱ्या जगभरातील पंचांनी आजतागायत त्यांच्या विशेष शैलीने नाव कमावले आहे.
आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक पंच होऊन गेले आहेत. डॅरेल हेयर, डॅरिल हार्पर, सायमन टॉफेल, श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, फ्रेंच चेस्टर, हेरॉल्ड डिकी बर्ड, डेव्हिड शेफर्ड, चार्ली इलियट, डगलस सेंग ह्यू, स्टीव्ह बकनर, बिली डिक्ट्रोव्ह, डेव्हिड कॉस्टेंट, स्टीव्हन डन, बिली बाऊडेन, रुडी कर्टसन, डेव्हिड आर्चर्ड, व्ही. के. रामास्वामी, खिजर हयात, आलम दार, असद रऊफ, के. टी. फ्रान्सिस, अशोक डिसिल्व्हा, रसेल टिफिन यासारख्या जागतिक दर्जाच्या पंचांनी प्रामाणिकपणा, आगळी-वेगळी शैली, अचूक निर्णय या आणि अशा अनेक गोष्टींमुळे नावलौकिक मिळविले आणि अनेकांच्या पसंतीसदेखील उतरले.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे मानत चौकोनी चेहरे करून क्रिकेट हा खेळ पाहिला जायचा आणि खेळला जायचा. मात्र हळूहळू या खेळात रंजकता आणण्याचे काम क्रिकेट पंचांकडून केले गेले. कित्येक पंचांमुळे क्रिकेटच्या मैदानात हास्याचे फवारे फुलायला सुरुवात झाली. पंच लोकाभिमुख झाले आणि हळूहळू क्रिकेट सामन्यांमध्ये गोलंदाजी, फलंदाजी यासह पंचांची अदाकारीही लोकप्रिय होऊ लागली.
या सर्वांची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेले न्यूझीलंडचे बिली बॉऊडेन यांनी केली. बिली बॉऊडेन हे केवळ निर्णयांसाठीच नव्हे तर मैदानावरील मजेशीर हावभावांसाठीही प्रसिद्ध होते. त्यांनी मैदानावर निर्णय देताना अनेकवेळा केलेल्या मजेशीर कृती क्रिकेट चाहत्यांच्या आणि खेळांडूंच्याही पसंतीस पडल्या.
इंग्लंडचे पंच डिकी बर्ड हे देखील मजेशीर अदाकारीसाठी प्रसिद्ध झाले. तर संयमी आणि अचूक निर्णय देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सायमन टॉफेल हे नावारूपास आहे. अचूक पंचगिरीशिवाय मैदानातील खेळाचे पवित्र टिकवणे अशक्य आहे. त्यामुळे मैदानावरील पंच पंचगिरीचे काम करतच असतो. खेळाला आणि खेळाडूला सर्वात जवळून पाहणारा आणि खेळाला नियंत्रित करणारा अधिकारी म्हणून भूमिका बजावणाऱ्या पंचांची आजची व्याख्या थोडी वेगळी झाली आहे. खेळासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे पंचदेखील आज आपल्याला दिसून येतात.
श्री चषक स्पर्धेत मुंबईचे डान्सिंग पंच गोट्या अंतिम सामन्यात आले होते उद्याच्या श्री चषक मध्ये पंच म्हणून काम पाहणारे बारामती येथील डॅनी सकट हेदेखील त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. नृत्याच्या माध्यमातून आपले निर्णय सांगण्याची त्यांची विशिष्ट शैली खूप प्रसिद्ध आहे. युट्युबवर त्यांच्या या विशेष शैलीचे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय आहेत. यामुळे उद्याच्या अंतिम सामन्यात क्रिकेटसोबतच त्यांची अदाकारी पाहण्याची संधीही क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.