Wednesday, January 8, 2025

/

शिवसन्मान पदयात्रेला उत्स्फूर्तपणे प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हितदृष्टीच्या उद्देशाने आजपासून रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसन्मान पदयात्रे’ला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आज येळ्ळूर येथील राजहंसगडावरून करण्यात आला.

रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. पदयात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. जोरदार घोषणाबाजी करत गड परिसर दणाणून सोडण्यात आला. येळ्ळूर भागातून सुरु करण्यात आलेल्या पदयात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवरायांचा राजकारणापुरता करण्यात येणारा वापर, निवडणुका जवळ आल्यानंतर मराठी माणसांचा सोयीनुसार करण्यात येणारा वापर, रेल्वेस्थानकावर जाणीवपूर्वक डावलण्यात आलेली शिवरायांची प्रतिमा, रेल्वेस्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव देऊन नामकरण करणे, राजकीय स्वार्थासाठी मराठी मतदारांचा करण्यात येणारा वापर, भगव्याची सातत्याने होणारी विटंबना, शिवरायांची होणार अवमान असे विविध उद्देश दृष्टिकोनात ठेवून याविरोधात आवाज उठवून जनजागृती करण्यासाठी हि पदयात्रा आयोजिण्यात आली आहे.Padyatra

पदयात्रेच्या पहिल्याच दिवशी दिसून आलेला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पुढील ५ दिवस हि यात्रा उत्स्फूर्तपणे सुरु राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे. सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी हि पदयात्रा असून अधिकाधिक सीमावासीयांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धामणे, अवचारहट्टी आदी भागात महाराष्ट्र एकीकरण समिती,शिवभक्तांनी  सकाळच्या सत्रात शिव सन्मान पद यात्रेचे स्वागत करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करत सहभाग दर्शवण्यात आला.

शिवसन्मान पदयात्रेचे धामणे विभागात जल्लोषी स्वागत

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी माणसाची अस्मिता जगविण्यासाठी हाती घेण्यात आलेली शिवसन्मान यात्रा २२ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान शहरातील दक्षिण विभागात संचार करणार आहे. या यात्रेचा आज पहिलाच दिवस असून राजहंसगडावरून धामणे विभागात पोहोचलेल्या या पदयात्रेचे धामणे येथील मराठी भाषिक जनतेने सहर्ष स्वागत केले.

शिवसन्मान पदयात्रेतील भगव्या ध्वजाचे आणि पदयात्रेचे धामणे विभागातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले. धामणे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने या पदयात्रेला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच या पदयात्रेचा उद्देश सिद्ध व्हावा यादृष्टीने भविष्यातही मराठी अस्मिता टिकवण्यासाठी होणाऱ्या सर्व आंदोलनात रमाकांत कोंडुसकर यांच्या पाठीशी संपूर्ण धामणे विभाग असेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. शिवसन्मान पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण सीमाभागातील मराठी माणसाची अस्मिता जागृत होईल, मराठी माणूस एकसंघ होईल आणि याचा फायदा नक्कीच आगामी विधानसभा मतदार संघात होईल, असा विश्वास व्यक्त करत शिवसन्मान पदयात्रेच्या संकल्पाचे यावेळी उपस्थितातून कौतुक करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.