बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतर्फे सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या शहरातील तब्बल 950 जणांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
या भरतीसाठी जे अर्ज महापालिकेने आरोग्य विभागात उपलब्ध करून दिले होते, यामुळे आरोग्य विभागातून 950 जणांनी अर्ज नेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यानुसार सफाई कामगार भरती प्रक्रियेत शेकडो जण इच्छुक असल्याचे निदर्शनात आले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 13 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असून अर्ज नेणाऱ्यांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
या भरती प्रक्रियेत केवळ ऑनलाइन वेतन घेणाऱ्या सफाई कामगारांना संधी देण्याचा निर्णय आधी महापालिकेने घेतला होता. पण, सर्वच कंत्राटी कामगारांनी अर्ज दाखल केल्याने नियमानुसार सर्वच अर्जांची पडताळणी करून पात्र सफाई कामगारांची निवड करावी लागणार आहे. अर्ज येणाऱ्या मध्ये महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांची संख्या अधिक आहे.
शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीचा अधिकार आयुक्तांना दिल्यामुळे भरती प्रक्रिया महापालिकेतच आयुक्तांकडूनच केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी हितरक्षण समितीचे पदाधिकारी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. महापालिकेत सफाई कामगारांची 100 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सफाई कामगारांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, यासाठीही त्यांनी प्रयत्न चालविले आहेत.
लोकसंख्येच्या निकषानुसार महापालिकेत आणखी 100 नियमित सफाई कामगार भरती करण्याचा आदेश शासनाकडून बजावण्यात आला आहे. त्यामुळे, ही नवी भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये रोस्टर पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. यानुसार रीतसर अर्ज मागून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 153 सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बहुतेक अर्जदारांनी 100 कामगार भरती प्रक्रियेसाठी ही अर्ज दाखल केले आहेत.
फेब्रुवारी 2022 पासून महापालिकेत 153 सफाई कामगारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी 950 होऊन अधिक अर्ज महापालिकेकडे दाखल झाले होते. त्या अर्जांची पडताळणी महापालिकेत तब्बल सहा महिने सुरू होती. अखेर डिसेंबर मध्ये पडताळणी पूर्ण करून सर्व अर्ज अंतिम कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास योजना विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.
सदर भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्तीचा अधिकार मनपा आयुक्तांना नव्हता. हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता. यामुळे १५३ जणांची भरती हि आता जिल्हाधिकाऱ्यांकडूनच केली जाणार आहे.