बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी विकासकामांची गती वाढली आहे. विकासकामांचे गाजर दाखवून जनतेला भुलविण्याचे काम राजकारणी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी करत असून याचा प्रत्यय ग्रामीण मतदार संघात येत आहे.
सध्या ग्रामीण मतदार संघात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीचे तसेच रस्ते विकासकामांचे पेव फुटले आहे. गावातील प्रत्येक गल्ली-बोळ सध्या रस्त्याच्या विकासकामाने झपाटले आहे. झालेली विकासकामे पाहून जनता खुश होईल, आणि याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत होईल या दृष्टीने हि कामे चालली आहेत.
मात्र हिंडलगा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीनगर आणि डिफेन्स कॉलनी यादरम्यान झालेल्या रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. डांबर आणि खडी यांचे मिश्रण करून वरवर रस्त्याचे काम करून पक्का रस्ता झाल्याचे भासविण्यात आले आहे.
रस्त्याचे कामकाज पूर्ण झालेल्या दुसरे दिवशीच रस्त्याच्या बाजूने खडी आणि डांबर उखडत असल्याचे निदर्शनात आले आहे. यासंदर्भात ग्रामीण मतदार संघातील नागरिकांनी विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नावे बोटे मोडण्यास सुरुवात केली असून जनतेच्याच पैशातून अशापद्धतीने होणाऱ्या अशा निकृष्ट दर्जाच्या कामकाजाबाबत ताशेरे ओढण्यात येत आहेत.
विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी सुरु आहे. हिंडलगा कार्यक्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या रस्ते विकासकामांच्या ठिकाणी विकासासंदर्भात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे कामकाज थांबले आहे त्या – त्या ठिकाणी मातीचे ढीग जसेच्या तसे टाकून देण्यात आले आहेत.
या भागात झालेले रस्त्याचे कामकाज हे अशास्त्रीय आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले असून रास्ता बनविणाऱ्या कंत्राटदाराला याबाबत जाब विचारण्यात यावा, अशी मागणी येथील जनता करत आहे.