बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा मंदिर पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थळ कायाकल्प आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद) या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र त्या अनुषंगाने कोणताही निधी मंजूर झालेला नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जी. कृष्ण रेड्डी यांनी दिली. खासदार इराणा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पर्यटन विकास हा प्रामुख्याने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यटन विकासासाठी पर्यटन मंत्रालयाने कर्नाटक सरकारकडे कोणताही अर्थसहाय्याचा प्रस्ताव पाठवलेला नाही.
तथापि स्वदेश दर्शन आणि नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रेज्युव्हीनेशन अँड स्पिरीच्युअल हेरिटेज ॲग्युमेंटेशन ड्राईव्ह (प्रशाद) योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालय देशातील पर्यटनाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकार व केंद्रशासित प्रशासनांना अर्थसहाय्य देते.
शाश्वत आणि जबाबदार पर्यटन त्यांच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून पर्यटन मंत्रालयाने आपल्या स्वदेश दर्शन योजनेमध्ये स्वदेश दर्शन 2.0 (एसडी2.0) अशी सुधारणा ही केली आहे.
एसडी2.0 योजनेमध्ये हंपी आणि म्हैसूर या स्थळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. याबरोबरच प्रशाद योजनेमध्ये कर्नाटकातील पुढील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
म्हैसूर कर्नाटक येथील मां चामुंडेश्वरी देवी मंदिराचा विकास उडपी जिल्ह्यातील कुंजरूगिरी येथील श्री मध्व वाणा मंदिर, बिदर जिल्ह्यातील पापनाश मंदिर आणि बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा मंदिर.