बेळगाव शहर आणि परिसरात असणाऱ्या पोल्ट्री फार्मवर जिवंत कोंबडीचा दर 82, 83 ते जास्तीत जास्त 85 रुपयापर्यंत आहे. मात्र याच परिसरात कापलेल्या कोंबडीचा अर्थात चिकन सेंटर मधील एक किलो चिकन चा दर अडीचशे रुपये च्या घरात जाऊन पोहोचू लागला आहे.
एक तर कोंबडीचा पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दर उतरल्यामुळे नुकसान आणि ग्राहकांना चढादर देऊन चिकन खरेदी करण्याची वेळ सध्या आली असून यासंदर्भात नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
जिवंत कोंबडी पेक्षा कापलेली कोंबडी महाग अशा या परिस्थितीचा गैरफायदा कोण घेत आहे? याचा तपास करून संबंधित खात्याने चिकनचे दर निर्धारित करण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. सध्या जत्रा आणि यात्रांचा मौसम सुरू आहे. यामुळे मटणाची मागणी जोरदार वाढलेली आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या सुमारास जिवंत कोंबड्यांचे दर कमीच होतात. याचा परिणाम म्हणून चिकनचे दरही कमी होण्याची गरज असते मात्र तसे होत नाही.
मार्च एप्रिल नंतर कोंबडीची मागणी वाढते आणि चिकनचे दर ही वाढू लागतात. 31 डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान चिकनचे दर अर्थात जिवंत कोंबडीचे दरही वाढलेले असतात. मात्र फेब्रुवारीच्या दरम्यान यात्रांचा काळ आणि इतर अनेक कारणांमुळे कोंबडीचा दर कमी होतो. मात्र हा दर चिकन सेंटरमध्ये मात्र तितकाच पाहायला मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बेळगावच्या उपनगरी भागात 220 रुपये प्रति किलो दराने चिकन विक्री सुरू आहे.
बेळगाव शहरातील काही चिकन सेंटरमध्ये चिकनचा दर 250 रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत चिकन खावे की न खावे असा प्रश्न उपस्थित झाला असून पूर्वीप्रमाणे घरीदारी कोंबड्या पाळून त्याच्यावर ताव मारण्याची वेळ आता नागरिकांवर येणार आहे.
इतर खर्चामुळे होते चिकन दरवाढ -भादवणकर
पोल्ट्री फार्म वर जिवंत कोंबडीचा दर 85 रुपये असला तरी वाहतूक वगैरे इतर खर्च लक्षात घेता ग्राहकांच्या हातात पोहोचेपर्यंत चिकनचा दर वाढलेला असतो. प्रत्येक धंदा नफा कमवण्यासाठी केला जातो तर मग आम्ही थोडा नफा कमवला तर काय बिघडले, अशी प्रतिक्रिया प्रशांत भादवणकर या चिकन विक्रेत्यांनी दिली.
‘जिवंत कोंबडी 85 ला कापून मिळते 250 च्या घरात’ या शीर्षकाखाली बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्तासंदर्भात भादवणकर बोलत होते. प्रशांत भादवणकर म्हणाले, मान्य आहे की सध्या 85 रुपये किलो असा कोंबडीचा दर सुरू आहे. मात्र कोंबड्या आणण्यासाठीचा वाहतुकीचा खर्च, कामगारांचा खर्च, दुकानाच्या देखभालीचा खर्च, याखेरीज महापालिकेला भरावा लागणारा कर, त्याचप्रमाणे कचरा उचल करणाऱ्यापासून तो भरून घेऊन जाणाऱ्यापर्यंत सर्वांना द्यावे लागणारे पैसे, हा सर्व खर्च काढून चिकन विक्रेत्याला 23 टक्के नफा मिळतो. आजच्या घडीला आदित्य मिल्कवालाही 23 टक्के नफा कमवतो. हॉटेलवाल्यांच्या नफ्याची कमाई तर 50 टक्के इतकी असते. त्यावर तुमचा आक्षेप नाही, फक्त चिकन विक्रेत्यांच्या बाबतीतच आक्षेप का? असा सवाल करून प्रशांत भादवणकर यांनी शहरात 250 रुपये किलो या दराने चिकनची विक्री होत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच लॉकडाऊन नंतर शहरात पानपट्टीची दुकान कमी आणि चिकनची दुकानात जास्त झाली असून यापैकी कांही चिकन दुकानदारांमुळे चिकन विक्री व्यवसायाबाबत गैरसमज पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले.