बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत, तसा आमदार रमेश जारकीहोळी आणि ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. राजकारणातील या दोन व्यक्तींमुळे बेळगावमधील मतदार संघापैकी ग्रामीण मतदार संघात चुरशीने निवडणूक होणार हे मात्र नक्की आहे! आज बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावात रमेश जारकीहोळी समर्थकांचा मेळावा पार पडला. जल्लोषी स्वागत आणि समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. एका महिन्यातील रमेश जारकीहोळींचा हा दुसरा मेळावा असून हा मेळावादेखील बहुसंख्य समर्थकांच्या उपस्थितीत पार पडला.
या मेळाव्यात व्यासपीठावरून रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा ग्रामीण आमदारांना लक्ष्य करण्यात आले. बागेवाडी भागात झालेल्या सुधारणांमुळे कंत्राटदार गब्बर झाले आणि पुढे त्यांनाच निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडण्यात आले, असा टोला लगावत हिरेबागेवाडी येथे झालेल्या विकासकामात मोठा गोलमाल झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पंचायतीची निधी मंजूर झाला तर आमदारांना निधी मंजूर झाल्याप्रमाणे वर्तन केले जाते. गावपातळीवर घडणाऱ्या गोष्टी आज देशपातळीवर घेऊन जाण्यात येत असून काँग्रेसकडून होत असलेल्या खालच्या पातळीच्या राजकारणाबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला. बेळगावचे ग्रामीण क्षेत्र आपण तयार केले आहे. मात्र सध्याच्या आमदार आपणच या भागाचा विकास केल्याचा अविर्भाव आणत आहेत. भाजप सरकारनेच या भागाच्या विकासासाठी निधी मंजूर केला. या सर्व गोष्टी येत्या दोन महिन्यात स्पष्ट होतीलच, असेही जारकीहोळी म्हणाले. ग्रामीण आमदारांच्या वाहनातून त्यांचे बंधू आणि मुलगा हे एजंटप्रमाणे फिरत असतात. मात्र आमदार हेब्बाळकर यांच्याबरोबर आगामी निवडणुकीनंतर कोणीही राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार करून राणी कित्तूर चन्नम्मा यांच्यासंदर्भात माझी ऑडिओ क्लिप जोडून नाहक बदनामी करण्यात आली. माझ्याकडून कित्तूर राणी चन्नम्मा यांच्यासंदर्भात कोणताही अवमान झाला नसून निवडणुका जवळ आल्या कि अशापद्धतीने आमदार हेब्बाळकर आणि डीकेशिवकुमार यांच्याकडूनच असे कृत्य केले जाऊ शकते असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.
राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यास काँग्रेस पक्षाने भली मोठी पाहुण्यांची यादी तयार केली आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री, जिल्हा पालकमंत्री, खासदार जिवंत असून लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह आपणही उपस्थित राहणार असून तत्पूर्वी आपण राजहंसगडाला भेट देणार असल्याचेही ते म्हणाले. लोकार्पण सोहळा हा एक सरकारी कार्यक्रम असला पाहिजे आणि या कार्यक्रमात काही चुका झाल्या तर ती ग्रामीण आमदारांची जबाबदारी असेल, असेही जारकीहोळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू वाटप करण्याचे पेव फुटले असून ग्रामीण आमदार मतदारांना जे देतील त्याच्या दुप्पट आपण देण्यासाठी तयार असल्याचे विधानही रमेश जारकीहोळी यांनी केले.