बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील राजहंसगडाचा विकास करण्यात येत असून सध्या गडाचे विकासकाम अंतिम टप्प्यात आले आहे. राजहंसगडाच्या विकासाचे श्रेय हे सर्वपक्षीयांचे असल्याचे सांगत काँग्रेस एकट्यानेच हे सर्व श्रेय लाटण्याच्या तयारी असल्याचा आरोप करत माजी मंत्री आणि गोकाक मतदार संघाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी आज राजहंसगडाला आवर्जून भेट दिली.
किल्ले राजहंसगच्या विकासाच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या राजकारणादरम्यान आज महाशिवरात्रीनिमित्त रमेश जारकीहोळी यांनी माजी आमदार संजय पाटील, राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, बेळगाव भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव आणि भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आज राजहंसगडाला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली.
दरम्यान यावेळी राजहंसगडाची पाहणी करण्यासाठी आलेले ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांचे बंधू, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे गडावरून परतताना त्याचवेळी रमेश जारकीहोळी यांचेही वाहन तेथे दाखल झाले. दोन्ही नेत्यांची वाहने आमोरा-समोर आली आणि यावेळी हेब्बाळकर-जारकीहोळी समर्थकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
जारकीहोळी यांनी आपले वाहन आहे त्याच जागी थांबविले तर हट्टीहोळी यांना मात्र आपले वाहन माघारी घेऊन मार्गक्रमण करावे लागले. यादरम्यान हेब्बाळकर-जारकीहोळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राजहंसगड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. याचप्रमाणे राजहंसगड परिसरात निवडणूक प्रभारी राकेश सिंग यांनीही भेट दिली, हा चर्चेचा विषय बनला होता.
रमेश जारकीहोळी यांनी कन्नड माध्यमांशी बोलताना मी हट्टीहोळी यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही डी के शिवकुमार यांच्या टीकेला उत्तर देऊ असे सांगत हट्टी होळी यांच्याबद्दल बोलणेचं टाळले.