शहरातील आदर्शनगर, राम कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाण्याची समस्या कायम आहे. सध्या तर गेल्या पाच दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी ओसंडून वाहत सार्वजनिक जागेत आणि घरात शिरत असल्यामुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर उपनगरातील विविध ठिकाणच्या स्मार्ट सिटी कामांतर्गत झालेल्या चुकांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनला गळती लागल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातच उपनगर परिसरातील आदर्शनगर, राम कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाण्याची समस्या कायम असून, गेल्या पाच दिवसांपासून येथील ड्रेनेज चेंबर मधून सांडपाणी बाहेर पडून सार्वजनिक जागेत आणि घरात शिरत आहे.
या संदर्भात महापालिकेला माहिती देण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान दौऱ्याच्या कामात गुंतलेल्याचे कारण देत, महापालिका अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून आदर्शनगर, राम कॉलनी येथील सांडपाणी समस्याने गंभीर स्वरूप घेतले आहे. ड्रेनेज चेंबर तुंबून ड्रेनेजचे घाण पाणी सार्वजनिक जागेत, घरात शिरले आहे. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार केली असता महापालिकेचा आरोग्य आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
अलीकडेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन साफ करण्याचे प्रयत्न केले. मात्र ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ही समस्या दूर झालेली नाही. या ठिकाणी कांही अंतरापर्यंत नवी ड्रेनेज लाईन आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे मत असून त्यांनी तसे बांधकाम विभागाला कळविले आहे. सदर सांडपाण्याची समस्या दूर करण्यासाठी, बांधकाम विभागाने काही अंतरापर्यंतची ड्रेनेज पाईप लाईन बदलणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे राम कॉलनी येथील सांडपाण्याची समस्या बिकट बनली आहे. स्थानिक नागरिकांना मात्र प्रत्येक दिवशी दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरणाला तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणच्या घरातील शौचालयाच्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ती तुंबून राहत आहेत.
घरातील शौचालय आणि स्नानगृहासह मोकळ्या जागेत शिरलेल्या सांडपाण्यामुळे डास माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र त्याचे कोणतेही देणे घेणे महापालिकेला दिसत नाही. ड्रेनेज समस्येसह सांडपाण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीना माहिती देण्यात आली आहे. ते देखील या समस्येकडे कानाडोळा करत असल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.