बेळगाव लाईव्ह : राजहंसगडाच्या विकासकामावरून सुरु असलेल्या राजकारणाच्या चर्चेत आता माजी आमदार संजय पाटील यांनी उडी घेतली असून आम. रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत राजहंसगडावर भेट देण्यासाठी आलेल्या संजय पाटलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजहंसगडाच्या विकासाचे श्रेय एकट्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि काँग्रेस लाटण्याच्या तयारीत आहे. मात्र राजहंसगडाच्या विकासाचा शुभारंभ भाजपच्या कार्यकाळात २०१० साली आपण आमदार असताना झाला आहे. ज्या गडावर पायी चालत येणं शक्य नव्हतं त्या गडावर तत्कालीन पर्यटन विकास मंत्री जनार्धन रेड्डी यांच्यासमोर प्रस्ताव मांडून राजहंसगड हे सीमाभागातील जनतेसाठी स्मारक बनाव आणि याठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रस्थापित व्हावी यासाठी शिवरायांचा इतिहास समजावून सांगून १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले.
यावेळी तातडीने ४ कोटी १६ लाख रुपयांचा निधी २०१० साली देण्यात आला. या निधीतून गडावरील रस्ते, तटबंदी, पिण्याचे पाणी, सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार तसेच भूस्खलन रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. प्रसिद्ध कलाकार नितीन देसाई यांनी गडाची पाहणी करून गडावर शिवरायांच्या मूर्तीच्या स्थापनेबाबत कल्पना दिल्या. यानंतर तातडीने अर्ज करून ७५ लाख रुपये मंजूर करून घेण्यात आले. मात्र २०१३ साली आपला पराभव झाल्याने पुढील कामकाज आपण करू शकलो नाही. आपल्या कार्यकाळात ४ वेळा विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. गडाचे विकासकाम पूर्ण करण्यासाठी २० लाख रुपये ताबडतोब मंजूर करून घेतले. यातील २० रुपयेही काँग्रेसने दिले नाहीत.
राजहंसगडाचा विकास करण्याचे स्वप्न आपण पहिले होते. मात्र माझे स्वप्न हेब्बाळकर कशा काय पूर्ण करणार? अशा शब्दात त्यांनी हेब्बाळकरांची खिल्ली उडवली. ज्या गडाच्या विकासकामासाठी आपल्या सरकारने ७५ लाख रुपये मंजूर केले त्यातील ७५ रुपये तरी काँग्रेसने मंजूर केले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लक्ष्मी हेब्बाळकर या जनतेची दिशाभूल करतात, फसवणूक करतात आणि खोटेही बोलतात. आजवर त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना कुठेच केली नाही किंवा कोणत्या मंदिरांना देणगी दिली नाही. याउलट आपण आपल्या कार्यकाळात सर्वधर्मसमभाव या भावनेने जनतेशी आपुलकी जपली. मात्र, निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या लक्ष्मी हेब्बाळकर या निवडणुकीचे साधन म्हणून मराठी मतांवर डोळा ठेवून विकासाचा पाढा वाचत असल्याचा आरोपही संजय पाटील यांनी केला. शिवरायांचे नाव हे केवळ निवडणुकीपुरते न घेता त्यांच्यासमोर सातत्याने नतमस्तक होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवराय हे आपले आराध्य आहेत.
यामुळे त्यांच्यासंदर्भातील कोणत्याही गोष्टीसाठी आपण आडकाठी करणार नाही. गडाच्या विकासासाठी भाजपचे कन्नड व सांस्कृतिक मंत्री सुनीलकुमार यांनी सध्या निधी मंजूर केला आहे. यामुळे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यादरम्यान ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित केले आहे त्यानुसार शिष्टाचार पाळून कर्नाटकातील मंत्र्यांनाही आमंत्रित करणे गरजेचे असल्याचे संजय पाटील म्हणाले.