बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उदघाटन समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी बेळगावच्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या पार्श्वभूमीवर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे, कृषीसह विविध विभागांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कोणतीही कसर न ठेवता आवश्यक तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर पुढील चर्चा करून योग्य ते निर्देश दिले जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीला जिल्हा पंचायत मुख्य प्रशासकीय अधिकारी हर्षल भोयर, रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती हरिता, डीसीपी शेखर एसटी, अपर जिल्हाधिकारी के.टी.शांतला, डीसीपी स्नेहा आदी उपस्थित होते.