बेळगाव लाईव्ह : कल्लेहोळ गावच्या एका सुपुत्राने दिव्यांगावर मात करून मॅरेथॉनमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले.
गटशिक्षणाधिकारी कार्यालय कोकटगेरे, तुमकूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी हायस्कूल, कल्लेहोळ येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी परशुराम मरूचे याने ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
परशुराम याच्या मानेला अपंगत्व आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन यामध्ये अव्वल क्रमांक मिळविण्याची तीव्र इच्छा होती. जिद्द व कठोर परिश्रमाच्या आधारावर त्याने उज्ज्वल यश मिळवले असून क्रीडा शिक्षक रणजीत कणबरकर यांनी त्याच्याकडून रोज धावण्याचा सराव करून घेतला आहे. ध्येय साध्य करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश मिळते हे दाखवून देत परशुराम मरूचे याने हे यश संपादित केले आहे.
या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. याच शाळेचा इयत्ता 9 वी चा विद्यार्थी कु. सुदर्शन भीमराव खनुकर, याने भालाफेक मध्ये चौथे स्थान पटकावले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री रणजित कणबरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका हसीना मारीहाळ मॅडम यांचे व इतर शिक्षकांचे तसेच शाळेच्या SDMC चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांचे प्रोत्साहन लाभले.