बेळगाव रेल्वे स्थानक उद्घाटन जाहीर सभा वगैरेंसाठी बेळगाव दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी बेळगावात कांही तासासाठी असणार असले तरी त्यासाठी शहरातील दुकानांसमोर तीन दिवस दुचाकी तथा अन्य वाहने थांबवण्यास बंदी घातल्यामुळे व्यापाऱ्यांवर संक्रांत ओढवली आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याची पोलीस प्रशासनाने चांगली धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. कारण पंतप्रधानांचा रोड शो होणाऱ्या संपूर्ण 12 कि. मी. मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स घालून पथदीप आणि रस्त्याला जोडणारा भाग गेल्या शुक्रवारपासूनच बंद करण्यात आला आहे.
त्यातच आता पोलिसांनी नोटीस बजावत काल शनिवारपासून म्हणजे 25 ते 27 फेब्रुवारी पर्यंत या मार्गावरील दुकानांसमोर कोणत्याही प्रकारच्या सायकली किंवा वाहने थांबवू नयेत असा आदेश बजावला आहे.
पंतप्रधानांच्या रोड शोला ए पी एम सी परेड मैदान जवळून प्रारंभ होणार असून ,नेहरू नगर,लक्ष्मी कॉम्प्लेक्स ,सिव्हिल इस्पितळ रोड राणी चन्नम्मा सर्कल येथून कॉलेज रोड मार्गे, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, शिवभवन येथून शनी मंदिर मार्गे कपलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड, बँक ऑफ इंडिया, कुलकर्णी गल्ली रोड मार्गे जुना पी.बी. रोड, धारवाड नाका येथून मालिनी सिटीपर्यंत हा रोड शो होणार आहे.
त्यामुळे या सर्व परिसरातील दुकानासमोर कोणत्याही प्रकारची वाहने थांबविता येणार नाहीत. परिणामी या परिसरातील दुकानांकडे ग्राहक देखील पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोडशो मार्गावरील व्यापाऱ्यांना तीन दिवस आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.