भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मान्यतेने बेळगाव विमानतळाने वाहन पार्किंगचे दर जाहीर केले असून विमानतळ आवारात 10 मिनिटापेक्षा अधिक काळ थांबणाऱ्या वाहनांना पार्किंग शुल्क अदा करावे लागणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मान्यतेने बेळगाव विमानतळाने वाहन पार्किंगचे दर जाहीर केले असून एक नियम ही जारी केला आहे. या नियमानुसार तुम्ही वाहन घेऊन विमानतळाच्या ठिकाणी प्रवेश केल्यापासून पुन्हा तिथून बाहेर पडण्यापर्यंतच्या काळात प्रवाशांना सोडण्यासाठी अथवा त्यांना घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 मिनिटांचा कालावधी असणार आहे.
या काळात प्रवाशांना सोडण्याचे अथवा घेऊन जाण्याचे काम झाले नाही तर संबंधित वाहनाला पार्किंग शुल्क लागू होणार आहे. पार्किंग शुल्काचे दर पत्रक विमानतळाच्या प्रवेश मार्गाच्या ठिकाणी लावण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या बेळगाव विमानतळाने जाहीर केलेले वाहन पार्किंग शुल्क पुढील प्रमाणे आहे.
कोच, बस, ट्रक या वाहनांसाठी 30 मिनिटाला 20 रुपये आणि 30 ते 120 मिनिटांसाठी 50 रुपये. टेम्पो, मिनीबस, कार या वाहनांसाठी 30 मिनिटाला 20 रुपये आणि 30 ते 120 मिनिटांसाठी 35 रुपये. दुचाकी वाहनांसाठी 30 मिनिटाला 10 रुपये आणि 30 ते 120 मिनिटांसाठी 15 रुपये.