बेळगाव लाईव्ह : ११ वर्षांच्या प्रदीर्घ अवधीनंतर पाच्छापूर येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला शुक्रवार दि. ३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. भंडाऱ्याची उधळण आणि भाविकांच्या अमाप उत्साहात हा यात्रोत्सव मोठ्या दिमाखात पार पडत आहे. लक्ष्मीदेवीची विवाह सोहळा, रितीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा यासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनानाने हि यात्रा पार पडत आहे.
यात्रा ठिकाणी येण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष बसची सुविधाही भाविकांसाठी उपलब्ध करून दिली असून गुरुवार दि. ९ आणि शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी बकरी मारण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून दररोज यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडाऱ्याची उधळण आणि देवीचा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत.
मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार असून लक्ष्मी देवीला गदगेवरून उठवून वाजत गाजत मिरवणुकीने या यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली.
लक्ष्मीदेवी गदगेची आकर्षक आरास, गदगेच्या बाजूला आकर्षक आरास आणि विद्युत दिव्यांनी सजविलेला रथ उभारण्यात आला आहे.
या यात्रेसाठी पाच्छापूरसह अंकलगी, गोकाक आणि विविध परिसरातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. या यात्रोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.