पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी काही बसेस आरक्षित ठेवण्यात आल्याने अनेक मार्गावरील बस सेवा रद्द होणार असून त्यामुळे येत्या सोमवारी बेळगाव शहर व ग्रामीण बस सेवेवर परिणाम जाणवणार आहे बस सेवा रद्द होणार असल्यामुळे प्रवाशांना देखील गैरसोईचा सामना करावा लागणार आहे.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारील मालिनी सिटी येथे येत्या सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्यातून भाजपचे लाखो कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहण्यासाठी येणार असून त्यासाठी अनेक नेत्यांनी प्रत्येक गावातून खाजगी वाहनांसह परिवहन बसेस आरक्षित केल्या आहेत.
परिवहन महामंडळाने बेळगाव शहर, ग्रामीण आणि आंतरराज्य सेवेतील कांही बसेस यासाठी राखीव ठेवल्या आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील ‘चलो मुंबई’ आंदोलनासाठी परिवहन मंडळाच्या बसेस आरक्षित केल्या आहेत.
बेळगाव आगारात बस सेवेची संख्या अपुरी असल्याने इतर आगारातून यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधीच बेळगाव परिवहन विभागाला 200 बसेसची कमतरता भासत असताना आता मोठ्या प्रमाणात बसेस आरक्षित झाल्याने सोमवारी कमी प्रवासी संख्या असलेल्या मार्गावरील बस सेवा रद्द केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा रोड मैदानावरून सुरू होऊन कॉलेज रोड मार्गे जाणार असल्याने कांही काळासाठी या मार्गावरील बस सेवा देखील स्थगित ठेवली जाणार आहे. या पद्धतीने एकंदर त्या दिवशीचे परिवहन बस सेवेचे वेळापत्रकच कोलमडणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे.