Thursday, December 26, 2024

/

महाराष्ट्रातील नेत्यांवर आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र सरकार समोर कर्नाटकाच्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनात आज महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी आणि मंत्री महोदयांनी उपस्थिती दर्शविली. धरणे आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भेट दिली.

यावेळी त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. कर्नाटकातील सीमाभागात असलेला मराठी माणूस अन्यायाखाली गुदमरत आहे. या ना त्या कारणामुळे सीमाभागातील मराठी माणूस नाहक भरडला जात आहे. कर्नाटक सरकारने मराठी माणसावर अन्याय करण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मात्र, तरीही महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी शांतच आहेत. छत्रपती शिवरायांचा अवमान असो किंवा महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी केलेली असो. त्या कोणत्याही संदर्भात महाराष्ट्रातील सत्ताधारी ठामपणे आपली बाजू मांडत नाहीत.

आजवर महाराष्ट्राने कुणासमोरही मान खाली केली नाही. मात्र, विद्यमान सरकारने कर्नाटकात महाराष्ट्राच्या झालेल्या अवमानावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. Rohit pawar

तसेच महाराष्ट्र कधीही झुकत नाही आणि झुकणारही नाही असे सांगत कर्नाटकात मराठी माणसा संदर्भात सुरू असलेले राजकारण हे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्नाटकात मराठी माणसावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी अजित पवारांनी आवाज उठविला. इशारा दिला. त्यावेळी कर्नाटकातील नेतेमंडळींनी आवरते घेतले. मात्र, सत्तेत असलेल्या नेत्यांनी कर्नाटकात महाराष्ट्र आणि मराठी माणसासंदर्भात होत असलेल्या अवमानाप्रकरणी कोणतीच भूमिका घेतली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.