बेळगाव लाईव्ह : सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ‘चलो मुंबई’ची हाक देण्यात आली आहे. येत्या २७ आणि २८ फेब्रुवारी या दरम्यान हजारो सीमावासीय मुंबईला धडकणार असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी समिती नेत्यांना अनेक सूचना केल्या. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेला महामेळावा दडपण्यासाठी समिती नेत्यांना अटक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने चलो कोल्हापूरची हाक देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडले. सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आला असून महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या तारखा लांबणीवर पडत आहेत. कर्नाटक सरकारकडून खटल्यासाठी दररोज ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, सीमाप्रश्नी खटला चालविण्यासाठी वकिलांना फी देण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागत आहे. या गोष्टीची जाणीव आंदोलनाच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे. ही परिस्थिती अशी असेल तर सीमाप्रश्नी खटला कुणाच्या आशेवर लढवायचा? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राला जाग आणून देण्यासाठी २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली नावे आपल्या विभागातील गट समितीकडे १० फेब्रुवारीपर्यंत आधार कार्डसहित नोंदवायची आहेत. या आंदोलनासाठी बसमधून जाण्यासाठी प्रत्येकी ११०० रुपये आणि रेल्वेमधून जाण्यासाठी साधारण ७०० रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चाचे नियोजन कार्यकर्त्यांनी करायचे असून राहण्याची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. जे कार्यकर्ते स्वतःच्या वाहनातून आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांनीही आपले वाहन क्रमांक आणि नावे नोंदवावीत असे आवाहन समिती बैठकीत नेत्यांनी केले.
यावेळी समिती नेते दीपक दळवी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातून सीमाभागाला आणि सीमाप्रश्नाला पाठबळ मिळत नाही. सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिकाला महाराष्ट्राकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या आंदोलनातून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्याचे कार्य करण्यात येणार असून सीमावासीयांना कोणाचा पाठिंबा नसला तरी आमच्या जिद्दिवर लढा कायम ठेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील आणि इतर अनेक समिती नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात सूचना केली. विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील चारही मतदार संघात समितीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समिती नेत्यांनी एकजूट राखणे अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत उपमहापौर पदासाठी आरक्षणानुसार समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत शहर समितीचे दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, , विकास कलघटगी, देवस्की पंच कमिटीचे रणजित चव्हाण पाटील, बी. डी. मोहनगकर आदींसह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.