बेळगाव लाईव्ह : गोकाक क्षत्रिय मराठा समाजातर्फे गुरुवदंना व मराठा समाज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. बंगळूरच्या गोसावी मठाचे मंजुनाथभारती स्वामी, काद्रीळीचे गुरुपुत्र महाराज, आमदार रमेश जारकिहोळी, केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी, राज्य मराठा महामंडळाचे अध्यक्ष मारुती मुळे, सुरेश साठे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर शामसुंदर गायकवाड, ऍड. विनय मांगलेकर, डॉ. जी. आर. सूर्यवंशी, नगरसेविका निर्मला सुजी, प्रकाश मुरारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांची अश्वारूढ मूर्ती सुवर्णसौधसमोर उभारण्यात काहीही गैर नाही. मूर्ती उभारण्यासाठी शासनदरबारी आपण प्रयत्नशील आहे, अशी माहिती केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.
यावेळी आमदार रमेश जारकीहोळी यांनी, मराठा समाजाला एकसंघ राहण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. ते पुढे म्हणाले, कर्नाटकात ७५ मतदारसंघात मराठा विधानसभा समाजाचे प्राबल्य असून त्यात जिल्ह्यातील दहा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातील तीन मतदारसंघात मराठा उमेदवार स्वबळावर निवडून येण्याची क्षमता आहे. पण, समाजात एकी नसल्याने अन्य दुहीचा फायदा उठवत आहेत.
परिणामी शासनदरबारी समस्यांवर आवाज उठविण्यात हा समाज कमी पडत आहे. त्यामुळे पुढील काळात समाजाने ऐक्य टिकविण्याची गरज असल्याचे मत आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. या वेळी शामसुंदर गायकवाड, मंजुनाथ स्वामी, गुरुपुत्र महाराज प्रा. मधुकर पाटील, पूजा मिलके यांनीही विचार व्यक्त केले.
गोकाक शहरालगतच्या जत- जांबोटी राज्य महामार्गालगत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान निर्माण करण्यासाठी गोकाक मराठा समाजाने केलेल्या मागणीनुसार नगरपालिकेने सहा गुंठे जागा मंजूर केली असून या जागेचे मंजुरी पत्र मंजुनाथ स्वामींच्या हस्ते जितू मांगलेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी मराठा गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून मेळावा स्थळापर्यंत लेझीम, ढोलताशासह कलशधारी सुवासिनींची मिरवणूक काढण्यात आली. अनिल मिलके यांनी स्वागत केले. प्रा. शिवाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. रामचंद्र काकडे यांनी सूत्रसंचलन तर डॉ. जी. आर. सूर्यवंशी यांनी आभार मानले.