बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी 2022 -23 सालातील त्यांच्या हक्काच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या फंडाचा (एमपीएलएडीएस) 100 टक्के विनियोग केला आहे. वार्षिक 25 कोटी रुपयांचा संपूर्ण फंड त्यांनी 2022 -23 मध्ये मंजूर केला आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी मंजूर केलेल्या एमपीएलएडीएस फंडापैकी 88 टक्के फंड 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत खर्च करण्यात आला असून उर्वरित 12 टक्के फंड विकास कामे अद्याप सुरू असल्यामुळे खर्च व्हावयाचा आहे. भारत सरकारने 23 डिसेंबर 1993 रोजी अंमलात आणलेल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत (एमपीएलएडीएस) लोकसभेचा प्रत्येक सदस्य आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची सूचना जिल्ह्याच्या प्रमुखांना करू शकतो. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एमपीएलएडीएस अंतर्गत 25 कोटी रुपयांचा फंड अर्थात निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 22.34 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मतदार संघात 727 विकास कामांचा प्रस्ताव होता, त्यापैकी 378 विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. कर्नाटक राज्यात भाजपच्या 25 खासदारांसह एकूण 28 खासदार आहेत. ज्यांनी लोकसभा सदस्यांसाठी मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या निधीपैकी फक्त 20 कोटी (14 टक्के) निधीचाच विनियोग केला आहे. त्यामुळे खासदार फंडाच्या वापरात देशात कर्नाटक 16 व्या क्रमांकावर आहे.