बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागातील महिलांना समृद्ध करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासह महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे.
रोहयोत ग्रामीण भागातील कुटुंबांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा पंचायतीकडून ‘घरोघरी रोजगार’ अभियान राबविले जात आहे. याच माध्यमातून रोहयोसंबंधी जनजागृती करण्यासह आरोग्य तपासणी शिबिरांचीही माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे, रोजगार हमी योजना आता ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणारी योजना ठरणार आहे.
माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी) उपक्रमांतर्गत रोहयोतील मजुरांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. रोहयो मजुरांना त्यांचे अधिकार समजावून सांगण्याचे काम आयईसी करते. जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरु असते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोहयो मजूर काम करत असलेल्या ठिकाणी हे शिबीर भरविले जाईल.
तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. या योजनेतंर्गत आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी शिबीर भरविले जाणार आहे. एखादा मजूर आजारी आढळल्यास समुपदेशन करून त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केले जातील.
ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य रोहयोशी जोडलेला असल्याने आयईसीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची त्यांची काळजी घेणे शक्य आहे. त्यासाठी तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाणार आहे. कोरोना संसर्ग आणि ग्रामीण पातळीवर महिलांना होणारे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरणार आहेत. जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २,३१,७६८ कुटुंबांना रोहयोतून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात महिला आघाडीवर आहेत. जिल्ह्यात रोहयोत ४६.०५ टक्के महिलाक काम करतात. कोरोना काळातही रोहयोचे काम सुरु होते. जिल्ह्यात २०१९-२० मध्ये १,७६, ७९६ कुटुंबांनी रोहयोत काम केले होते. त्यावेळी १४, ५२२ नव्या कुटुंबांची भर पडली होती. तर २०२०-२१ मध्ये २,२७,४५३ कुटुंबांची नोंद होती.