टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस पासून ते अनगोळ क्रॉस पर्यंतच्या डांबरीकरण केलेल्या सुस्थितीतील बेळगाव -खानापूर रोडचे अचानक पुन्हा कॉंक्रिटीकरण केले जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेचा संपत आलेला कालावधी आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी विकास निधी संपवून कमिशन लाटण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप होत असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
टिळकवाडी येथील आरपीडी क्रॉस येथून अनगोळ क्रॉसच्या दिशेने जाणाऱ्या बेळगाव -खानापूर दुपदरी रस्त्याचे सध्या कॉंक्रिटीकरण केले जात आहे. खरंतर या रस्त्याचे अलीकडेच्या काळातच चांगल्या प्रकारे डांबरीकरण करण्यात आले होते. आरपीडी क्रॉसच्या ठिकाणी सदर रस्ता कांही प्रमाणात खराब झाला असला तरी एकंदर या रस्त्याच्या बाबतीत कोणतीच तक्रार नव्हती अथवा मागणीही नव्हती. मात्र असे असताना देखील अचानक या रस्त्यावर जवळपास फुटभर उंचीचे सिमेंटचे ब्लॉक घालून काँक्रीटकरण केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा तर झालाच आहे शिवाय रस्ता सुस्थितीत असताना हा उपद्व्याप कशासाठी? असा सवालही उपस्थित होत आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
‘अल्पावधीत 24 तास पुरवठ्यासाठी या रस्त्यावर काँक्रीट कटर मशीन रस्ता फोडण्याकरता उतरले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही… एकंदर शेवटी निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वी सर्व निधी खर्च करायचा आहे… त्यामुळे कंत्राटदारांची लाळ टपकत आहे आणि कमिशन एजंट प्रचंड घाईत आहेत.. अशी प्रतिक्रिया आर. के. पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सुमितराज पाटील यांनी ‘आता काही महिन्यात एल अँड टी कडून रस्ता खोदायची वाट पहा’ असे म्हंटले आहे. मनोज व्हीआर यांनी अस्तित्वात असलेला अस्पाल्ट रोड चांगला होता. विनाकारण निविदा निश्चित व्हाईट टॉपिंग अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर एन. बी. अशोकराव यांनी ‘हा रस्ता अलीकडेच डांबरी करण्यात आला होता. मग पुन्हा त्यावर सिमेंटचा रोड कशासाठी असा सवाल केला आहे. आणखी एकाने ‘पहिल्यांदा डांबरी रस्ता करा आणि त्यानंतर त्याचे कॉंक्रिटीकरण करा.
ही रस्ते तयार करण्याची प्रक्रिया आकलना पलीकडची आहे’ असे म्हंटले आहे. व्हीसल ब्लोअर नामक नेटकऱ्याने ‘इलेक्शन की तयारी… रात का भाव 2 हजार रुपये कहा से आयेगा… यही तो माल देगा… सर्वत्र विनाशकारी कॉंक्रिटीकरण… पर्यावरणाचा ऱ्हास निश्चित! व्हॅक्सीन डेपो तेव्हाच गिळंकृत केलंय… ‘अशी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.