बेळगाव लाईव्ह : रिंगरोड प्रस्ताव रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली असून गुरुवारी (दि.९) कडोलीतील शेतकऱ्यांनी शिवबसव नगर येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवत रिंगरोडसाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठणकावून सांगितले.
गुरुवारी शिवबसवनगर येथील महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी रिंगरोडसाठी आपण जीव देऊ पण एक इंचही जमीन देणार नसल्याचे सांगितले.
कडोली भागातील शेतजमीन अत्यंत सुपीक आहे. त्यामुळे या शिवारातून रिंगरोड करू नये. त्याऐवजी फ्लायओव्हरचा पर्याय निवडावा, अशी सूचना केली. यावेळी कडोली भागातील ४८ शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले.
ऍड. शाम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऍड. महेश मोरे, ऍड. कमलेश मायाण्णाचे, शेतकरी दत्तू जाधव, प्रकाश राजाई, विनोद भोसले, बाळू बायनाईक,
तानाजी कुट्रे, यल्लाप्पा जाधव, शांता तलवार, दिलीप पाटील, दुधाप्पा सनदी, सुधीर जाधव, विनोद भोसले, बसवंत मायाण्णाचे, शिवाजी कुट्रे, शाम पाटील यांच्यासह बहुसंख्येने कोडोली मधील शेतकरी उपस्थित होते.
अजून आठ दिवस तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांची सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिंगरोडला विरोध दर्शवित आहेत. तरीही महामार्ग प्राधिकरण रिंगरोडचा प्रस्ताव रद्द करण्यास चालढकल केली जात आहे.
त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना अधिक आक्रमकपणे रिंगरोडविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. रिंगरोड विरोधात सर्व गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.