स्मार्ट सिटी विभागाकडून बेळगाव शहरातील समाज कल्याण व अल्पसंख्यांक विभागाच्या विद्यार्थी वस्तीगृह आणि निवासी शाळा अशा एकूण 20 ठिकाणी बहुउद्देशीय हायटेक लर्निंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
गरीब कुटुंबातून व ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शिक्षण दिले जात नाही. डिजिटल क्लास रूम, डिजिटल लायब्ररी या संकल्पना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच शहरात 20 ठिकाणी बहुउद्देशीय हायटेक लर्निंग सेंटर सुरू केले जाणार आहे. येत्या 30 जून रोजी स्मार्ट सिटी योजना बंद होणार असून त्याआधी शहरात ही योजना राबवली जाणार आहे.
सदर योजनेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून स्मार्ट सिटी विभागाने निविदा मागविल्या आहेत. निविदेतील सर्वात कमी दरानुसार या योजनेसाठी किती निधी लागणार हे निश्चित केले जाणार आहे. शासकीय वस्तीगृहांमधील विद्यार्थी, निवासी शाळांमधील विद्यार्थी यांना राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवण्यासाठी या लर्निंग सेंटरचा वापर केला जाणार आहे.
याशिवाय येथे डिजिटल ग्रंथालय उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध असेल. माहिती, संवाद व तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.