बेळगाव लाईव्ह : मागील वर्षभरात विद्युत कंपन्यांनी दोनवेळा वीजदरवाढ केली असून आता पुन्हा राज्यातील विद्युत कंपन्यांनी कर्नाटक वीज नियामक आयोगाकडे वीर दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.
मागील वर्षी वीजदरात दोनवेळा वीजदरात वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये केईआरसीने वीज दरात प्रति युनिट ३५ पैशांनी वाढ करण्याचा आदेश जारी केला होता तर सप्टेंबरमध्ये वीज दरात २४ पैशांवरून ४३ पैसे प्रति युनिट अशी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यामुळे वीज दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. जनतेला खुश ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वी वीजदरात वाढ करण्यात येणार की, निवडणुकीनंतर दरवाढ होणार याबाबतचा निर्णय अनिश्चित आहे.
राज्यातील चार विद्युत कंपन्यांकडून (एस्कॉम) प्रति युनिट दीड ते दोन रुपये दरवाढीची
मागणी केली आहे. दरवाढीवर सार्वजनिक हरकती ऐकून घेण्यासाठी वीज नियामक आयोग (केईआरसी) १३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत सार्वजनिक अदालत घेणार आहे. दरवर्षी वीज दरवाढीसाठी एस्कॉस्म केईआरसीकडे प्रस्ताव सादर करते. त्यानुसार यावेळीही १.५० रुपये ते २ रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जनतेच्या अदालतीनंतर केईआरसी आपला निर्णय जाहीर करणार आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केईआरसीने दरवाढीचा निर्णय घ्यावा. आचारसंहिता लागू झाली, तर दरवाढ करता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विजेच्या दरात वाढ होणार की, निवडणुकीनंतर वीजदरात वाढ होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.