बेळगाव शहराच्या रिंग रोड विरोधात आक्षेप नोंदविल्यानंतर सुनावणीसाठी आज मंगळवारी सकाळी बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर आपली बाजू मांडताना रिंग रोडसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
बेळगाव शहराच्या सभोवती होणाऱ्या रिंग रोडसाठी भूसंपादनाचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर त्याच्या विरोधात तालुक्यातील 32 गावांमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आक्षेप नोंदविले आहेत.
या आक्षेपांवर शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात सुनावणी होऊन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली जात आहे. सदर सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
ही सुनावणी प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांच्यासमोर होत असून आज मंगळवारी बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी रिंग रोडच्या विरोधात आपली बाजू मांडली. तसेच कोणत्याही परिस्थितीत रिंग रोडसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. आजच्या सुनावणीस बेळगुंदी येथे सुमारे 40 हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात आज बेळगुंदीच्या शेतकऱ्यांसमवेत ॲड. सुधीर चव्हाण ॲड. श्याम पाटील व ॲड. आर. आय. पाटील हे देखील हजर होते.
बेळगाव रिंग रोड संदर्भातील सुनावणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने उपस्थित राहून निषेध नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत रिंग रोड रद्द करून घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी म. ए. समिती भक्कमपणे उभी आहे, असे मत ॲड. सुधीर चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.