बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी कुत्रांमुळे नागरिकांना उपदव्याप सहन करावा लागत आहे.गेल्या दोन अडीज वर्षात विविध ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर महिन्याभरापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
आदर्श नगर, राम कॉलनी येथील रहिवासी नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे गुरवारी सकाळी त्यांचे निधन झाले असून मागील महिन्यात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
९ जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश कुसाणे यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी नागेश यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात, वहिनी, तीन पुतण्या असा परिवार आहे.
अवघ्या सहा दिवसांपूर्वीच नागेश यांच्या भावाचा मृत्यू झाला होता.आठवडाभरात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्यामुळे कुसाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेश यांच्या निधनाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. कुसाने कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
नागेश कुसाणे यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवार (दि. १३) रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे.
बेळगाव महानगरपालिकेचे सभागृह नुकताच अस्तित्वात आलेले आहे नूतन महापौर आणि उपमहापौर दोघांनी देखील आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत महापालिकेने करावी आणि भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या वाढू लागलेली आहे.
ही बातमी देखील वाचा…