बेळगाव शहरानजीकच्या ऐतिहासिक राजहंसगडाचा विकास आणि गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना या गोष्टी आता राजकीय अस्त्र बनले आहेत. या गोष्टींचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
खरं सांगायचं तर संजय पाटील हे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार असतानाच राजहंस गडाच्या विकासाची योजना आखण्यात आली होती. एवढेच नव्हे तर गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती उभारण्याची घोषणा करणाऱ्या संजय पाटील यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री जनार्दन रेड्डी यांना राजहंस गडावर निमंत्रित करून योजनेसाठी हिरवा कंदीलही मिळवला होता
. त्यानंतर पर्यटन खाते, कन्नड व सांस्कृतिक खाते आणि आमदार निधी यांच्याकडून अनुदान मंजूर होऊन राजहंस गडाचा विकास साधण्यात आला आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्तीही उभारण्यात आली असून या मूर्तीचा लोकार्पण सोहळा येत्या मार्चमध्ये करण्याची तयारी बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरू केली आहे असा आरोप केला जात आहे.
दुसरीकडे याच विषयावरून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी हिरेबागेवाडी गावात पार पडलेल्या भव्य मेळाव्यामध्ये आमदार हेब्बाळकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
राजहंसगडावरील विकास कामे आणि शिवरायांच्या मूर्तीची उभारणी करण्यासाठी भाजप सरकारने अनुदान दिले असले तरी सर्व काही काँग्रेसनेच केले हे दाखविण्याची तयारी केली जात आहे. आमचे मुख्यमंत्री अजून जिवंत आहेत त्यांनाच मूर्ती उद्घाटनासाठी बोलवणार आहे असे जारकीहोळी यांनी म्हंटले आहे.
मी स्वतः राजहंस गडाला भेटी देऊन विकास साधला आहे, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सांगत आहेत. एकंदर राजहंस गडावरील विकास कामाचे उद्घाटन हे दोघांमधील संघर्षाचे कारण ठरत आहे. या संघर्षात अद्यापपर्यंत तरी माजी आमदार संजय पाटील यांची एंट्री झालेली नाही. आगामी दिवसात याच विषयावरून कोणकोणते आरोप होतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.