तुरमुरी येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल 25 कोटी रुपयांची 15 विकास कामे महापालिकेकडून राबविली जाणार असून या कामांपैकी 10 कामांसाठी ठेकेदार ही निश्चित झाले आहेत.
सदर विकास कामांना सुरुवात केली तर तुरमुरी व परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होण्याची भीती असल्यामुळे ती कामे अद्याप सुरू झालेले नाहीत. तथापि पुढील आठवड्यात गाजावाजा न करता सदर कामांना सुरुवात करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
तुरमुरे येथील कचरा डेपोला 2006 साली प्रारंभ झाल्यानंतर 2017 साली रामकी एन्वीरो कंपनीसोबत करार करून तेथे घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारण्यात आला. आता त्या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणे, तेथे अग्निशमन यंत्रणा बसविणे, प्रकल्पात चार ठिकाणी मोठे शेड बांधणे आदी विकास कामे राबविली जाणार आहेत. तुरमुरी कचरा डेपो येथील 15 विकास कामांपैकी 10 कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदार ही निश्चित झाले आहेत.
तुरमुरी येथील कचरा डेपो प्रकल्पाच्या विरोधात अनेकदा आंदोलन झाली आहेत. सदर कचरा डेपो प्रकल्पाचे स्थलांतर करण्याचा ठराव 2018 साली महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला आहे.
मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत महापालिकेने केलेली नाही. उलट आता तेथेच 25 कोटी रुपयांची विकास कामे राबविली जाणार आहेत.