आर्थिक व्यवहारातून अपहरण करून खून करण्यात आलेल्या गोकाक येथील व्यावसायिक राजेश झंवर यांचा मृतदेह तब्बल 6 दिवसांच्या अथक तपासनंतर पंचनायकनट्टी गावानजीक काल गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या हाती लागला आहे. या खून प्रकरणी आतापर्यंत दोघा डॉक्टरांसह एकूण 3 जणांना गजाआड करण्यात आले आहे.
गोकाक येथील व्यावसायिक राजेश सत्यनारायण झंवर यांचा गेल्या शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी खून करण्यात आला होता.
झंवर आणि त्यांचे मित्र गोकाकचे डॉ सचिन शिरगावी यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातून झंवर यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह घटप्रभा उजव्या कालव्यात टाकण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत डॉ. शिरगावी याच्यासह शिवानंद पाटील यांना अटक केल्यानंतर काल गुरुवारी तिसरा आरोपी शपथ त्रासगार (वय 25, रा. कन्नड गल्ली गोकाक) याला गजाआड केले आहे. डॉ. सचिन शिरगावी याने आपल्याच दवाखान्यातील डाॅ. शिवानंद पाटील यांच्यासह इतर तीन गुंडांकडून आपला मित्र राजेश झंवर याचा खून केल्याचे तसेच मृतदेह घटप्रभा नदीच्या उजव्या कालव्यात कोळची गावाजवळ टाकून दिल्याची कबुली दिली होती. त्या माहितीवरून पोलिसांकडून सतत 6 दिवस मयत राजेश झंवर यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता.
मृतदेह शोधण्यासाठी कालव्यात वाहणारे पाणी देखील कांही काळासाठी बंद करण्यात आले होते. दोन जिल्ह्यातील तब्बल 350 पोलीस कर्मचारी मृतदेह शोधण्याच्या कामास जुंपण्यात आले होते. सलग सहा दिवसांच्या तपासानंतर काल गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पंचनायकनट्टी गावानजीकच्या घटप्रभा कालव्यात राजेश झंवर यांचा मृतदेह आढळून आला. या पद्धतीने बेळगाव आणि बागलकोट जिल्हा पोलिसांच्या तपास कार्याला यश आले आहे.