बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) पडताळणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा गावातील भारतीय निवडणूक आयोगाच्या गोदामात सोमवारी (13 फेब्रुवारी) सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील पडताळणी करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला वापरण्यासाठी देण्यात आलेल्या मतदान यंत्रांची कसून तपासणी केल्यानंतरच वापर होईल, अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाकडून एकूण ८७४८ बॅलेट युनिट, 7216 कंट्रोल युनिट आणि 6319 व्हीव्हीपीएटी मशीन देण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहिल्या टप्प्यातील मतदान यंत्रांची पडताळणी राष्ट्रीय व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या 30 कुशल अभियंत्यांकडून प्रत्येक मतदान यंत्र नियमानुसार एकत्र करून कार्यक्षमता सुनिश्चित केली जाईल. पहिल्या टप्प्यातील पडताळणी दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत केली जाईल. राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या पडताळणीचे काम पाहू शकतील. सत्यापन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी वेब कास्टिंग देखील केले जात आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केवळ आवश्यक ओळखपत्र असलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मतदान यंत्रे हैदराबादहून सुरक्षितपणे आणून हिंडलगा गावातील एका गोदामात ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी पहिल्या टप्प्यातील पडताळणी पंधरवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती ईव्हीएम नोडल अधिकारी मोहना शिवन्नावर यांनी दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी के.टी.शांतला, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते, बेळगावचे उपविभागीय अधिकारी बाळाराम चव्हाण, निवडणूक अधिकारी गीता कौलगी, सतीश कुमार, डॉ.राजीव कुलैर, ईव्हीएम नोडल अधिकारी मोहन शिवण्णावर, निवडणूक शाखेच्या तहसीलदार सारिका शेट्टी, सहायक निवडणूक अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरु झाली विधानसभा निवडणुकीची तयारी
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील भारतीय निवडणूक आयोगाच्या गोदामात सोमवारी (13 फेब्रुवारी) रोजी डी सी नितेश पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ई व्ही एम मशिंनची पडताळणी केली pic.twitter.com/tCG6WgTsYD
— Belgaumlive (@belgaumlive) February 13, 2023