बेळगाव लाईव्ह : मनपा निवडणुकीला १७ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर बहुप्रतीक्षित बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक पार पडली असून ६ फेब्रुवारी रोजी बेळगाव मनपाचे सभागृह अस्तित्वात आले आहे. सभागृह तहकूब झालेल्या आधीची दोन वर्षे आणि निवडणुकीनंतरची दीड वर्षे म्हणजे निवडणूक झालेल्या तब्बल साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर सभागृह अस्तित्वात आले आहे. अस्तित्वात आलेल्या सभागृहाचे नियमित कामकाज आता कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या निवडणुका होण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागेल आणि त्यानंतर स्थायी समितीची निवड झाल्यानंतर बेळगाव महापालिकेची भाजपच्या महापौर-उपमहापौरांच्या कार्यकाळात पहिली मासिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सर्वसाधारण सभेत 58 नगरसेवक, तसेच आमदार, खासदार सहभागी होणार आहेत. मासिक सर्वसाधारण सभा एक महिन्याच्या कार्यकाळात होईल याचदरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बेळगाव महापालिकेची एक मासिक सभा, स्थायी समितीच्या निवडणुका यानंतर पुन्हा जवळपास दोन महिने पुन्हा आचारसंहितेमुळे मनपाचे सभागृह आणि कामकाज कचाट्यात सापडून महापालिकेचा कार्यभार दोन महिन्यांसाठी थांबणार आहे.
यानंतर अंदाजे जून महिन्यात कर्नाटकात नवे सरकार अस्तित्वात येईल आणि त्यानंतर जून महिन्यापासून सर्वसाधारणपणे बेळगाव महानगरपालिकेचा कार्यभार रीतसर सुरु होईल. पावसाळ्यातच खऱ्या अर्थाने महापालिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांना सभागृहाच्या कामकाजाची, सभागृहाच्या अनुभवाची, सभागृहात मांडण्यात येणारे प्रश्न, उपस्थित करण्यात येणारे मुद्दे किंवा इतरांच्या मुद्द्यावर टिप्पणी करणे, रखडलेल्या विकास कामांचा, स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा, स्वच्छतेच्या कामकाजाचा, कचऱ्यासंदर्भातील समस्यांचा पाठपुरावा करणे यासह अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, विविध विषय आणि समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कामे करवून घेण्याचा अनुभव घेणे अशा सर्व प्रकारच्या तयारीसाठी वेळ मिळणार आहे.
आज सभागृह अस्तित्वात आल्यानंतर मनपा सभागृहाचा पहिला दिवस होता. आगामी १५ दिवस नूतन महापौर-उपमहापौर सत्कार समारंभात सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असतील. गाठीभेटी घेण्यात वेळ निघून जाईल. स्थायी समितीच्या निवडणुका होतील आणि यानंतर मासिक सर्वसाधारण सभा होईल. यानंतर लागलीच आचारसंहिताही जाहीर होईल.
यानंतर पुन्हा दोन – अडीज महिने सभागृहाचे कामकाज स्तब्ध होईल आणि पुन्हा साधारण जून महिन्यापासून रीतसर मनपा कार्यभार सुरु राहील. भाजपच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या माध्यमातून बेळगावकरांना कोणत्या नव्या सेवा सुविधा उपलब्ध होतील, याची प्रतीक्षा आता साऱ्यांना लागली आहे.