बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील भाजपाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपने महापौर – उपमहापौर निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर आता गटनेते पदासाठी विरोधी पक्षात चढाओढ सुरु असून काँग्रेस आणि इतर अपक्ष उमेदवारांमध्ये विरोधी पक्ष गटनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
बेळगाव मनपात सत्तारूढ गटात एकूण ४२ नगरसेवक आहेत. तर विरोधी पक्षात काँग्रेसचे ११, महाराष्ट्र एकीकरण समितीचे ४ आणि काँग्रेस सतीश जारकीहोळी समर्थक ४ असे एकूण १९ नगरसेवक आहेत. ज्याच्याकडे 10 नगरसेवकांचे संख्याबळ असेल त्याच नगरसेवकाच्या गळ्यात विरोधी गटनेतेपदाची माळ पडणार आहे.
बेळगाव मनपाच्या विरोधी गटनेतेपदासाठी मुझम्मिल डोणी आणि बाबाजान मतवाले यांच्यात लढत सुरु आहे. मुझम्मिल डोणी यांना सेठ बंधूंचा तर बाबाजान मतवाले यांना जारकीहोळी यांचा पाठिंबा दिला आहे. मागील आठवड्यात शनिवारी जारकीहोळी समर्थकांची शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये डिनर पार्टीचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या डिनर पार्टीमध्ये सेठ बंधू समर्थक वगळता एमआयएमचे शाहिद पठाण, इम्रान फतेह खान यांच्यासह अपक्ष नगरसेवक देखील सहभागी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. यावरून सेठ आणि जारकीहोळी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
सेठ समर्थक मुझम्मिल डोणी आणि जारकीहोळी समर्थक बाबाजान मतवाले यांच्यात विरोधी पक्षनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून इम्रान फतेह खान यांनी मध्यस्थी करून उभयतांमध्ये एकमत घडवून आणण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र उभयतांमधील रस्सीखेच अशीच सुरु राहिली तर ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ या उक्तीप्रमाणे साहिल संगोळी हे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान काँग्रेसचा मनपातील विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी तीन वेळा निवडून आलेले मुझम्मील डोनी यांचे पारडे जड मानले जात असून त्यांनी आपल्याकडे 10नगरसेवकांनी पाठिंब्याची पत्रे दिली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान या सगळ्या विरोधी पक्ष नेते पदाच्या वादात सतीश जारकिहोळी, सुनील हनमन्नावर आणि राजू सेठ तिघे मिळून ठवरणार असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.