हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान चरित्राचा सर्वांमध्ये प्रसार व प्रचार होण्याकरिता दरवर्षीप्रमाणे शहरातील भगवे वादळ युवक संघातर्फे येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत शिवचरित्रावर आधारित भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा -2023 येथे आयोजित करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी व थोरामोठ्यानीही महाराजांचे चरित्र अभ्यासून त्यांचे आचार विचार आत्मसात करावे याकरिता मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्ली येथे आयोजित सदर स्पर्धा प्राथमिक गट (इयत्ता 1 ली ते 7 वी), माध्यमिक गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) आणि खुला गट (वयोमर्यादा नाही) अशा एकूण तीन गटात घेतली जाणार आहे.
प्राथमिक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये 7000, 5000, 4000, 3000 आणि 2000 रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये 11000,9000, 7000, 5000 व 3000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तसेच खुल्या गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 15000, 12000, 9000, 7000 व 5000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
याव्यतिरिक्त प्रत्येक गटातील पाच स्पर्धकांना प्रत्येकी 1000 रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त रोख पारितोषिकांसह विजेत्यांना शिवचरित्र, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भगवा ध्वज व शेला देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही प्रश्नमंजुषा स्पर्धा शिवचरित्रावर आधारित आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 प्रश्न असणार असून परीक्षेचा कालावधी 1:30 तासाचा असेल. विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशात व ओळखपत्रासह अर्धा तास आधी स्पर्धेच्या ठिकाणी हजर रहावयाचे आहे. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी प्रसाद मोरे (807321023), मेघन तारीहाळकर (7353253573) अथवा महेश काकतकर (7353200158) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.