बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. बुधवारी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली असून या निवडणुकीत भाजपला ३५ जागा तर काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार हे निर्विवाद आहे. मात्र, तरीही काँग्रेसने महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. याचप्रमाणे विरोधी पक्षातून गटनेतेपदासाठीही जोरदार तयारी सुरु आहे. काँग्रेस मधून मुजम्मिल डोणी, सोहेल संगोळी तर अपक्ष नगरसेवक रवी साळुंखे, बाबाजान मतवाले हे गटनेतेपदासाठी इच्छुक आहेत. अपक्ष नगरसेवक रवी साळुंखे यांनी गटनेतेपदासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर आरक्षणानुसार उपमहापौर पदासाठी ज्योती कडोलकर यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. यासाठी इतर मागास ब प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु आहे.
महानगरपालिकेत सध्या मुस्लिम समाजातील 14 नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये इकरा मुल्ला, मुजम्मिल डोणी, अफरोज शकील मुल्ला, सोहेल संगोळी, रियाज किल्लेदार बाबाजान मतवाले, शकीला मुल्ला, इमरान फतेखान, समीउल्ला माडीवाले, अजीम पटवेगार शामोबिन पठाण, खुर्शीदा मुल्ला, शाहिद पठाण आणि रेश्मा भैरकदार आदींचा समावेश आहे. यापैकी मुजमिल डोनी, अफरोज शकील मुल्ला, सोहेल संगोळी, समीउल्ला माडीवाले, रेश्मा भैरकदार, शकीला मुल्ला, शामोबिन पठाण, खुर्शीदा मुल्ला आदी नगरसेवक काँग्रेसचे आहेत तर इकरा मुल्ला, बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, इमरान फतेखान, अजीम पटवेगार हे अपक्ष आणि शाहिद पठाण हे एमआयएमचे नगरसेवक आहेत.
उपमहापौर पदासाठी नगरसेविका ज्योती कडोलकर यांना निवडणूक रिंगणात उररविण्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. मात्र आरक्षणानुसार त्यांना प्रमाणपत्र मिळविणे कठीण आहे. सध्या आरक्षणानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वैशाली भातकांडे यांना आरक्षणानुसार प्रमाणपत्र मिळाले असून महानगरपालिकेवर उपमहापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वैशाली भातकांडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक आहे.
मनपा निवडणूक झाल्यानंतर लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येण्यास बेळगावात याआधी इतका विलंब झाला नव्हता. २०१३ ला झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर १२ महिन्यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले होते, पण यावेळी १७ महिन्यांचा कालावधी उलटला असून येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय राजवट संपून अखेर महापालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येणार आहे.