कित्तूर कर्नाटक प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कित्तूर कर्नाटक विकास मंडळ स्थापनेची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. त्याचप्रमाणे किम्ससह राज्यातील चार वैद्यकीय विज्ञान संस्थांमध्ये प्रत्येकी सुमारे 6 कोटी रुपये खर्चाचे आयव्हीएफ क्लिनिक्स सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बेंगलोर येथे सांगितले.
बेंगलोर येथे विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बिदर आणि रायचूर नगरपालिकांचे महानगरपालिका दर्जामध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने तपासणी केली जाईल असे सांगून शिमोगा, विजयपुरा, रायचूर, हासन आणि कारवार अशा पाच ठिकाणी विमानतळांची निर्मिती केली जाईल. यापैकी शिमोगा आणि विजयपुरा येथील विमानतळं यावर्षी कार्यान्वित होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बळ्ळारी येथील विमानतळाच्या उभारणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून विमानतळाची उभारणी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या (पीपीपी मॉडेल) धर्तीवर केली जाईल. म्हैसूर विमानतळाची सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार 320 कोटी रुपयांचा निधी मंजूर करेल. कोप्पळ आणि दावणगिरी येथील विमानतळ बांधकामाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला आहे आणि लवकरच विमानतळ बांधकामासाठी पावले उचलली जातील. राज्यभरात विविध 25 ठिकाणी मिनी टेक्स्टाईल पार्कस् निर्मिती करण्याबरोबरच रायचूर, विजयपुरा, कलबुर्गी आणि चिक्कमंगळूर येथे मेगा टेक्स्टाईल पार्क उभारले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पुढे दिली.
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक सुमारे 30 कोटी रुपये खर्चाचे स्टार्टअप पार्क उभारण्यात येणार आहे. नेकार सन्मान सहाय्यामध्ये 3000 वरून 5000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
अंजनाद्री टेकडीच्या विकासांतर्गत सुमारे 100 कोटी रुपये खर्चाची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.