बेळगाव शहरात येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी माहिती कृषी खात्याच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारी असलेल्या मालिनी सिटी येथील प्रशस्त मैदानावर व्यासपीठ व शामियाना उभारण्याद्वारे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी केली जात आहे. या पूर्वतयारीची आज गुरुवारी पाहणी केल्यानंतर मंत्री करंदलाजे बोलत होत्या. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम संपूर्णपणे शेतकऱ्यांसाठी असणार आहे.
त्यामुळे शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित असणार असून विशेष करून शेतकरी महिलांची हजेरी लक्षणीय असणार आहे. देशात पहिल्यांदाच बेळगावातील कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत असे सांगून पंतप्रधानांच्या रोडशोचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख वगैरे अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो निश्चित केला जाईल, असे कृषी मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यासपीठाची उभारणीसह कार्यक्रमाच्या अन्य तयारीची माहिती मंत्री करंदलाजे यांना दिली.
येत्या चार दिवसात पार्किंग वगैरेची व्यवस्थेची सोय केली जाईल असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, आमदार पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी आदी अधिकारी मंत्री शोभा करंदलाजे यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.