बेळगाव :महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी म्हणजेच निवडून आल्यानंतर 518 दिवसांनी निवडणूक होणार आहे. तब्बल 17 महिन्यांनंतर बेळगावकरांना महापौर उपमहापौर मिळणार आहे.
महापौर आणि उपमहापौरपद महिलांसाठी राखीव आहे. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी तर उपमहापौरपद मागासवर्गीय ब महिलांसाठी राखीव आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल 6 सप्टेंबर 2021 रोजी घोषित करण्यात आले. त्यामध्ये 58 पैकी भाजपने 35 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले.
भाजपकडे मागासवर्गीय ब गटातील एकही महिला उमेदवार नाही. त्यामुळे उपमहापौरपद कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यासाठी लॉबिंग सुरू आहे.
KMC अधिनियम कलम 42 नुसार एक महापौर आणि एक उपमहापौर असेल. महापौर हा शहराचा ‘प्रथम नागरिक’ असतो. KMC (कर्नाटक महानगरपालिका) अधिनियम, 1976 नुसार, महापौरांना केवळ एक वर्षाचा कार्यकाळ असतो आणि त्यांना कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत.
बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर परिषदेची निवडणूक झाली आणि भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. आता महापौर आणि उपमहापौर पद कुणाच्या गळ्यात पडणार यासाठी रात्री उशिरा पर्यंत वरिष्ठ खलबते करत होते.