बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून ३० एप्रिल २०२३ रोजी या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
देशातील ५७ छावणी परिषदेपैकी १५ व्या क्रमांकावर असणाऱ्या बेळगाव छावणी परिषदेची निवडणूक केंद्र सरकारच्या छावणी अधिनियम २००६ (४१) १५ मधील उपकलम १ नुसार होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेशपात्र संरक्षण मंत्रालयाने नुकतेच प्रसिद्धीस दिले आहे.
कर्नाटक राज्यातील एकमेव छावणी परिषद असणाऱ्या बेळगाव छावणी परिषदेची स्वतंत्र अशी ओळख आहे. जवळपास १५ हजारच्या लोकसंख्या असलेल्या बेळगाव छावणी परिषदेची स्थापना १८३२ साली झाली असून अलीकडे छावणी परिषद महानगरपालिका व्याप्तीत वर्ग करण्यासंदर्भात हालचाली सुरु होत्या.
मात्र छावणी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुढील ५ वर्षे छावणी परिषदेचे अस्तित्व टिकून राहणार आहे. लवकरच आचारसंहिताही जाहीर होणार असून इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.
बेळगावसह देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या साधारण निवडणुका येत्या 30 एप्रिल 2023 रोजी घेतल्या जातील असे नमूद आहे. त्यानुसार त्या दिवशी देशातील बेळगावसह आग्रा, अहमदाबाद, अहमदनगर, अजमेर, इलाहाबाद, अल्मोडा, अमृतसर, औरंगाबाद, अयोध्या, बबीना, बादामीबाग, बकलोह, बरेली, बैरकपुर, कन्नूर, चकराता, क्लेमेंट टाऊन, दगशाई, डलहौजी, दानापूर, देहरादून, देवलाली, फतेहगढ, फिरोजपुर, जबलपूर, जालंधर, जलापहाड, जम्मू, झांसी, जतोग, कामठी, कानपूर, कसौली, खडकी, लंढौर, लैंसडाउन, लेबांग, लखनऊ, मथुरा, मेरठ, महू, मोरार, नैनिताल, नसीराबाद, पुणे, रामगड, राणीखेत, रूडकी, सागर, सिकंदराबाद, शहाजहापूर, शिलॉंग, सेंट थॉमस माउंट -कम -पल्लवरम, सुबाथू, वाराणसी आणि वेलिंग्टन येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत.
ब्रेकिंग न्युज : एप्रिल महिन्यात होणार बेळगाव कॅटोमेंट बोर्ड निवडणूक जाहीर pic.twitter.com/msZ5AXnqYN
— Belgaumlive (@belgaumlive) February 18, 2023