बेळगाव लाईव्ह : पशुसंगोपन विभागाच्यावतीने जनावरांच्या आरोग्य सेवेसंदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून जनावरांना आरोग्य सेवा जलदगतीने मिळाव्यात, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत फिरती चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, बहुतांशी पशुवैद्यकीय वाहने पशुवैद्य आणि वाहनचालकांअभावी वापराविना जागेवर थांबून आहेत. त्यामुळे या फिरत्या चिकित्सालयांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी सर्व फिरती चिकित्सालये लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्याला तब्बल ८२ फिरती चिकित्सालये मिळाली आहेत. मात्र, यापैकी काही वापराविना जागेवरच थांबून असल्याचे दिसत आहे. तज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि वाहनचालकांचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या २८ लाखांहून अधिक आहे.
या जनावरांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी फिरत्या चिकित्सालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांबरोबर वाहन चालकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून ही पशुचिकित्सालये सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री प्रभू चौहान यांनी दिली.
अपुऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा वेळी जनावरांच्या गोठ्यापर्यंत जाऊन जनावरांवर उपचार होणार आहेत. मात्र, अद्याप काही चिकित्सालयांकडून सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे फिरती पशुचिकित्सालये तातडीने सुरू करावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.