बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. पक्षांतर्गत वाद, विरोध आणि परस्पर मतभेदाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु असून सध्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींवर सर्वांचा रोष वाढत चालला आहे.
रविवारी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी आयोजिलेल्या चित्रकला स्पर्धेला शिक्षणाधिकाऱ्यांच्या आडून मज्जाव करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा हि बाब अधोरेखित झाली असून शिक्षणाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली हे पाऊल उचलले असल्याचे अनेक मान्यवरांनी नमूद केले आहे.
बेळगावचे आम आदमी पक्षाचे प्रभारी राजकुमार टोपाण्णावर यांनीही कालच्या प्रकाराबाबत निषेध नोंदवत मराठा समाजाला दबावाखाली आणण्यासाठी आणि मराठा समाजाची ताकद आपल्यावर भारी पडली तर आगामी निवडणुकीत आपला पराभव होईल, या भीतीने लोकप्रतिनिधींकडून अशा हालचाली सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे.
बेळगाव मधील शहर मतदार संघात सर्वाधिक मोठी व्होटबँक हि मराठा समाजाची आहे. त्यामुळे मराठा समाजाला डिवचले तर मराठा समाजाची ताकद आपल्यावर महागात पडेल या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी असा आटापिटा करत असल्याची टीकाही टोपाण्णावर यांनी केली. किरण जाधव यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना घडल्या प्रकाराबाबत इत्यंभूत माहिती देऊन वरिष्ठांकडे या प्रकाराबाबत तक्रार करण्याचा सल्ला किरण जाधव यांनी दिला.
याचप्रमाणे मनपा नगरसेवक, महापौर – उपमहापौरांनाही त्यांनी मोलाचा सल्ला दिला असून महानगरपालिका सभागृहात स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची सूचना दिली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हातचे बाहुले न बनता बेळगावचा विकास साधण्यासाठी स्वतंत्र ओळख निर्माण करून स्वबळावर सभागृहात आपले अस्तित्व सिद्ध करावे, असा सल्लाही त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक आणि महापौर- उपमहापौरांना दिला आहे.