बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम यादी जाहीर केली असून मतदार नोंदणी सर्वेक्षणानुसार राज्यातील सर्वाधिक नव्या (तरुण) मतदारांची नोंदणी बेळगाव जिल्ह्यात झाली आहे. राज्यातील टॉप ५ जिल्ह्यामध्ये नव्या मतदार नोंदणीमध्ये बेळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
याचप्रमाणे दिव्यांग मतदारांच्या यादीतही बेळगाव जिल्हा अव्वलस्थानी असून २०२३ सालच्या मतदार यादीनुसार बेळगाव जिल्हात ५४८२० तरुण मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. यामध्ये ३२१४५ पुरुष आणि २२६६७ महिला मतदारांचा समावेश आहे. तर ८ ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे. बेळगावनंतर तुमकूर, म्हैसूर, चित्रदुर्ग, हावेरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
बेळगावमधील दिव्यांगांनीही यावेळी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ३२७९८ नव्या दिव्यांग मतदारांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये २०१७० पुरुष मतदार आणि १२६२२ महिला मतदारांचा समावेश आहे.
तर ६ ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश या यादीत आहे. दिव्यांगांच्या मतदार नोंदणीतदेखील बेळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर बेळगाव पाठोपाठ म्हैसूर, तुमकूर, कलबुर्गी आणि चित्रदुर्ग या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.