पब्लिक बायसिकल शेअरिंग या उपक्रमाचा बेळगावात शुभारंभ झाला असून बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड सार्वजनिक खाजगी भागीदारीत (पीपीपी) ‘याना बाइक्स’ या सायकलींच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहे.
स्थानिकांसह पाहुण्यांसाठी बेळगाव शहर राहण्यायोग्य आणि इष्ट व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रम रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी करून रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. याखेरीज वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसून पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरात स्थापन केलेल्या डॉकयार्डातून माफक दरात याना सायकली भाड्याने उपलब्ध होणार आहेत. ग्राहकानी यासाठी रिफंडेबल डिपॉझिटचा समावेश असलेले आवश्यक शुल्क भरून नांव नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड मिळेल. हे कार्ड स्वॅप करून ग्राहक डॉकयार्ड मधील सायकल अनलॉक करण्याद्वारे ती भाड्याने वापरू शकतात. याना ॲपमध्ये उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहरात धर्मवीर संभाजी चौकात शहर बस थांब्याजवळ, आरपीडी कॉलेज रोडवर अजंठा कॅफे जवळ, टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणी, उद्यमबाग येथील उत्सव लॉज जवळ, उद्यमबागच्या बेल्को हायड्रोलिक समोर, फोर्ट रोडवरील जिजामाता चौकात, मध्यवर्ती बस स्थानक (सीबीटी) येथे, कलबर्गी रोडवर विशाल मेगा मार्ट जवळ, श्रीनगर गार्डन येथे, राणी चन्नम्मा चौकात, कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर कत्री) जवळ, एपीएमसी रोडवर, जाधव नगर डबल रोडवर, हनुमाननगर सर्कलमध्ये आणि हिंडलगा गणपती मंदिराच्या ठिकाणी बायसिकल शेअरिंग डॉकयार्ड उपलब्ध आहेत.
बायसिकल शेअरिंग उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ‘याना ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे ॲप ओपन करून आपण नजीकची याना बायसिकल शोधू शकाल. ती बायसिकल अर्थात सायकल आपण क्यूआर कोड स्कॅन करून अनलॉक करण्याद्वारे वापरू शकता.
वापरानंतर ती सायकल आपल्या जवळच्या याना डॉकयार्डमध्ये लावून मॅन्युअली लॉक करावयाची आहे. https://yaana.bike/ दर : 500 रुपये डिपॉझिट (रिफंडेबल)+15 रुपये प्रोसेसिंग चार्ज (नॉन रिफंडेबल). सायकल प्रकार, भाड्याचे शुल्क आणि वेळ मर्यादा पुढीलप्रमाणे असणार आहे. सायकल सिंगल स्पीड -दर 30 मिनिटाला 5 रुपये शुल्क, इलेक्ट्रिक स्कूटर -दर 30 मिनिटाला 20 रुपये शुल्क, इलेक्ट्रिक सायकल -दर 30 मिनिटाला 15 रुपये शुल्क.