वाहनांच्या नंबर प्लेट वरील अनधिकृत नावे, चिन्हं, संघटनांची नावे आणि इतर गैरगोष्टी विरुद्ध गेल्या डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत उघडलेल्या मोहिमेद्वारे कर्नाटक प्रादेशिक वाहतूक (आरटीओ) खात्याने एकट्या बेळगाव शहरात 3,633 वाहन मालकांवर गुन्हा नोंद केला असून तब्बल 1.12 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नागरिक जोपर्यंत कायद्याचे पालन करत नाहीत तोपर्यंत ही मोहीम तीव्रतेने सुरूच राहील असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या चिन्ह आणि नावांचा गैरवापर प्रतिबंधक कलम 3, 4 व 5 आणि नियम 50, 51 अन्वये वाहनांच्या नंबर प्लेटवर अनाधिकृत नावे, प्रतीक आणि चिन्हे लावणे गुन्हा आहे.
प्रादेशिक परिवहन खात्याने डिसेंबर 2019 आणि डिसेंबर 2022 या दरम्यान 6.07 लाख वाहनांची तपासणी केली. यामध्ये 14,620 वाहनांनी उपरोक्त कायद्याचा भंग केल्याचे आढळून आले.
वाहनांच्या नंबर प्लेटवर राज्याचे चिन्ह, राज्य अध्यक्ष व सेक्रेटरी यासारखा स्वतःचा हुद्दा, संघटनांची नावे यासारख्या कायदा भंग करणाऱ्या बाबी नमूद केलेल्या या 14,620 वाहन मालकांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून 1.12 कोटी रुपये इतका दंड वसूल केला आहे.