बेळगाव लाईव्ह : राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या ध्वजारोहणादरम्यान राष्ट्रध्वजाच्या उंचीहून अधिक उंचीवर लाल-पिवळा फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वज संहितेनुसार हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी मार्केट पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंदविली होती. या तक्रारीत राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रार नोंद झाल्यानंतर जेएमएफसी द्वितीय सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. राष्ट्रध्वज अवमान सुनावणी जलदगती न्यायालयात होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने ही बाब फारशी गांभिर्याने घेतली नाही.
सदर सुनावणीवर जबाब नोंदविण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. जबाब नोंदणी करताना सरकारी पक्षाच्या वकिलांनी उलटसुलट प्रश्नांचा भडिमार चालविला होता.
मात्र समिती नेते मदन बामणे यांनी न्यायालयात सडेतोड उत्तर देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली.