राकसकोप पाणीपुरवठा योजनेतील हिंडलगा उपसा केंद्रातील स्विच बोर्डचे दुरुस्तीचे काम आणि नव्या वीज पंपाची प्रात्यक्षिक या कारणास्तव उद्या सोमवार दि. 30 व मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी शहर पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
हिंडलगा येथील पाणी उपसा केंद्रातील स्विच बोर्डची उद्या सोमवारी दुरुस्ती केली जाणार आहे, शिवाय तेथील 600 अश्वशक्ति क्षमतेच्या विद्युत पंपाचे प्रात्यक्षिकही घेतले जाणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तेथील पाण्याचा उपसा बंद ठेवला जाणार आहे.
परिणामी उद्यापासून सलग दोन दिवस शहरात पाणीटंचाई उद्भवणार आहे. शहराच्या उत्तर विभागाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना, डिफेन्स विभाग, कॅन्टोन्मेंट परिसर, कर्नाटक औद्योगिक वसाहत, केएलई हॉस्पिटल, हिंडाल्को कंपनीला देखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
तसेच शहराच्या दक्षिण भागातील मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव व जुने बेळगाव येथे 30 व 31 रोजी पाणीपुरवठा होणार नाही.
या खेरीज शहराच्या उत्तर भागातील सह्याद्रीनगर कुवेंपुनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, सारथीनगर, विश्वेश्वरय्यानगर, जाधवनगर, अशोकनगर एपीएमसी रोड, अन्नपूर्णावाडी, पंजीबाबा, वीरभद्रनगर, बुडा योजनात क्र. 51, हनुमाननगर, कुमारस्वामी लेआउट, सैनिकनगर, बिम्स, केएलई हॉस्पिटल, शिवबसवनगर आंबेडकरनगर, डिफेन्स परिसर, कॅन्टोन्मेंट परिसर, हिंडाल्को, टीआयएडीबी या परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.