बेळगाव शहराचा केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आणि तेथील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा येत्या शनिवार दि 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘न भूतो न भविष्यती’ अशा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या मूर्ती स्थळाच्या सुशोभीकरणाच्या कामावर सध्या शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. या कामाची आज मंगळवारी सायंकाळी पाहणी केल्यानंतर आमदार बेनके प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की लोकार्पण सोहळ्यापूर्वी म्हणजे गुरुवार दि 26 जानेवारी रोजी सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होम हवन व महापूजा केली जाईल. त्यानंतर शुक्रवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजल्यापासून दुपारपर्यंत महाराजांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुशोभीकरण व छत्रपती संभाजी महाराज मूर्तीचा लोकार्पण सोहळा होईल अशी माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना मानणाऱ्या, त्यांना पूजणाऱ्या सर्व मंडळ व संघटनांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आखण्यात आला असल्याचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे ग्वालियरच्या सरदार घराण्याचे वंशज असलेले केंद्र सरकारचे माहिती आयुक्त, इतिहासकार, जेष्ठ पत्रकार व लेखक उदय माहुरकर यांनी या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक असणारे माहूरकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असून अशी महान व्यक्ती आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार हे आमचे भाग्य म्हणावे लागेल. तेंव्हा येत्या 26 व 28 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमाला समस्त शहरवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहून लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यास सहकार्य करावे. ढोल-ताशा, लेझीम पथकांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जानकारी असलेल्या सर्वांनी आमच्याशी संपर्क व सहकार्य करून या सोहळ्यात स्वतःचे शक्य होईल तितके योगदान द्यावे, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले.
धर्मवीर संभाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाबद्दल बोलताना या कामासाठी अजून थोडाफार खर्च येणार असून त्यासंदर्भात बुडाकडे अर्ज केला आहे. सुशोभीकरणासाठी कोणाकडूनही एक पैशाचे दान घेतलेले नाही. जेंव्हा सुशोभीकरण योजना अंमलात आणण्याचे ठरले तेंव्हाच मी लोकवर्गणीसाठी कोणतीही पावती काढू नये असे सांगितले होते. तसेच निधी कमी पडल्यास स्वतःच्या खिशातील पैसे झाले नसेल स्पष्ट केले होते. जनतेकडून निधी घ्यायचा नाही याचे कारण म्हणजे त्या निधीचा दुरुपयोग होईल किंवा छ. संभाजी महाराजांच्या नावावर कोणी पैसे खाल्ले अशी चर्चा होऊ नये, या दृष्टिकोनातून या विधायक कार्यासाठी लोकवर्गणी घ्यायची नाही असा संकल्प मी केला होता.
तो संकल्प मी पूर्ण केला आहे. पावती न काढता धर्मवीर संभाजी चौकातील मूर्ती परिसर सुशोभीकरणाची जबाबदारी मी पार पाडली आहे असे स्पष्ट करून 28 जानेवारी रोजीचा लोकार्पण सोहळा निश्चितपणे ‘न भूतो न भविष्यती’ असा दैदीप्यवान होईल असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शेवटी सांगितले.