बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या रहदारीसंदर्भात अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. सातत्याने रहदारीच्या समस्यांसंदर्भात रहदारी विभाग, पोलीस विभाग, प्रशासनाला माहिती आणि निवेदने सादर करूनही नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी अनेक अपघात आणि अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर आज टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळ स्थानिक नागरिकांनी अनोखे आंदोलन करुन लक्ष वेधले.
रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स अडचणीचे कारण बनत आहेत. गेल्या ८ वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरीकेड्समुळे रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत आणि नागरिकांची गैरसोयही होत आहे. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता पार करण्यासाठी त्रास होत आहे.
या मार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता अधिक आहे यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, रहदारी नियंत्रित ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरु करावी, तसेच रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी असे लक्षवेधी फलक ठेवून भारतीय घटनेने दिलेले सामाजिक हक्क द्यावेत अशी मागणी करत अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
या मार्गावरून रस्ता पार करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना अनियंत्रित रहदारीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करणाऱ्या नागरिकांना येथे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक त्रास सोसावे लागत आहेत. गेल्या आठ वर्षाहून अधिक काळ येथे असलेल्या बॅरीकेड्समुळे वारंवार या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
शिवाय देशमुख रोड वर बॅरिकेड्स लावण्यात आल्याने मंडोळी रोड ला जाणाऱ्या नागरिकांना वेढा घालून पुढे दुसऱ्या रेल्वे गेट कडे जावे लागत आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांना दैनंदिन दिनचर्येत अतिरिक्त वेळ या रस्त्याच्या रहदारीसाठी काढावा लागत आहे.
यामुळे येथील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रहदारी विभागाने या रस्त्यावरील बॅरिकेड्स तातडीने हटवून रहदारीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.